MHADA Mumbai Lottery News: स्वप्ननगरी मुंबईत प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्यांचं स्वत:चं हक्काचं घर असावं. हे स्वप्न साकार करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत, पण घरांच्या किंमती जास्त असल्यामुळे त्यासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु आता मुंबईतील अनेकांसाठी हक्काचं घर मिळवण्याची संधी जवळ आहे. मुंबई महापालिकेने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रमुख भागांमध्ये फक्त 12 लाख रुपयांमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना त्यांचं घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबई महापालिकेने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने मुंबईच्या माहुल परिसरात 4,700 घरे उभारली आहेत. या घरांची किंमत 12 लाख 60 हजार रुपये असून, या घऱांची विक्री लॉटरीद्वारे केली जाईल. बीएमसी म्हाडाच्या माध्यमातून या घरांची लॉटरी आयोजित केली जाईल. महापालिका कर्मचाऱ्यांना या लॉटरीसाठी सोमवारपासून अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, माहुलमधील या इमारतीच्या संकुलात शाळा, गार्डन, रूग्णालय आणि इतर अनेक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, लॉटरीत निवडलेले कर्मचाऱ्यांना हे घर विकायचे असेल तर ते 5 वर्षांनंतर कधीही विकू शकतील. म्हाडाच्या माध्यमातून या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल. या लॉटरीमुळे बीएमसी कर्मचाऱ्यांचे मुंबईत स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
एमएमआरडीएने प्रकल्पबाधितांसाठी सदनिका महापालिकेला हस्तांतरित केली आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या सदनिकांमध्ये कोणताही रहिवासी नाही आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च पालिकेवर पडत आहे. त्यामुळे महापालिकेने आता या सदनिकांना महापालिका कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर विकण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या माध्यमातून या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे.